वाशिम – देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा आहे. तर राज्यात महायुतीची हवा आहे. आणि यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांची हवा सुरु आहे. वादळ, वारा, पाऊस अशा सर्व संकटांसमोर महायुती खंबीरपणे उभी राहील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
प्रचार सभेदरम्यान जोरदार वारा सुटल्याने प्रमुख नेत्यांनी भाषणे आटोपती घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले असताना वारा शांत झाला. राजश्री पाटील यांना पाऊस आशीर्वाद देण्यासाठी असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण वादळ वाऱ्याशी टक्कर घेणारे मावळे आहोत. महायुती निवडणुकीच्या वादळाशी टक्कर देणारी आहे. त्यामुळे अनेक वादळे आली आणि गेली तरी महायुती मजबुतीने उभी आहे. अशी अनेक वादळे आपल्यासमोर येतील, पण त्याला कार्यकर्ता खंबीरपणे भिडून उभा राहील.
ही निवडणूक देशाच्या विकासाची आणि प्रगतीची आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविणारी ही निवडणूक आहे. वाशीम- यवतमाळ मतदारसंघाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर प्रेम केले आहे. महायुतीवर प्रेम दाखवावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील निर्णय घेतला. जर मी चुकीचा निर्णय घेतला असता तर तुम्ही एवढ्या हजारोंच्या संख्येने इथे आला असता का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी आम्ही काम करत आहोत. राज्यातील प्रत्येक माणसासाठी माझ्या शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहीन असा शब्द यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार रोटी कपडा मकान देणारे आहे. तर एकीकडे अहंकाराने भरलेले लोक एकत्र आले आहेत. 2014 आणि 2019 ला हे एकत्र आले. आता 2024 ला विरोधात बोलत आहेत. यानंतरच्या 2029 च्या आणि 2034 च्या निवडणुकीतही विरोधकांना यश मिळणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांना सगळ्यात प्रिय शिवसैनिक आहे. सर्व महायुतीचे कार्यकर्ते हाच आपला परिवार आहे. हम दो हमारे दो नाही, माझे कुटुंब माझा परिवार नाही, आता महाराष्ट्र आपला परिवार आहे. जेव्हा मला गर्दी दिसते, पब्लिक दिसते हेच माझे टॉनिक आहे. हीच माझी ऊर्जा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.