मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय सूक्ष्म आणि काटेकोरपणे नियोजन केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण यंत्रणेचे कौतुक केले. मतदारांना मतदानाच्या दिवशी चांगला अनुभव यावा, मतदान केंद्राच्या ठिकाणी निश्चित किमान सुविधा, रांग व्यवस्थापन, प्रसाधनगृह व्यवस्था आदी सुविधांची पूर्ण अंमलबजावणी करण्याचे निर्देश गगराणी यांनी दिले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकअंतर्गत बुधवार २० नोव्हेंबर रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मतदान होणार आहे. लोकशाही प्रक्रियेत आपले बहुमूल्य मत नोंदवणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी सुखद अनुभव येईल, याअनुषंगाने सर्व सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संपूर्ण यंत्रणेला दिले आहेत.
मतदान केंद्रांच्या ठिकाणी रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रतीक्षा कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी पंखा किंवा कुलर तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रत्येक ठिकाणी प्रसाधनगृहाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. ही प्रसाधनगृहे मतदानाच्या आधीच्या तसेच मतदानाच्या दिवशी स्वच्छ रहावीत यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नेटके नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी गगराणी यांनी दिले. मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी निश्चित किमान सुविधा उपलब्ध होतील, याची खातरजमा करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत बुधवार २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या तयारीचा आढावा घेणारी बैठक भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन सभागृहात आज (१४ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी हे अध्यक्षस्थानी होते दिव्यांग मित्र आणि दिव्यांग समन्वयक तसेच रांग व्यवस्थापनासाठी स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहणाऱ्या राष्ट्रसेवा दल (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांचे मतदानाच्या दिवशी सहकार्य लाभणार आहे. या स्वयंसेवकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यात यावे, असे आवाहन देखील गगराणी यांनी याप्रसंगी केले. अनेक मतदारसंघात गृहनिर्माण संस्थांच्या ठिकाणी मतदान केंद्रांची उपलब्धतता करून देण्याचा प्रयोग पहिल्यांदाच बृहमुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात पोहचणाऱ्या मतदान केंद्रांचे पोहचरस्ते आणि प्रसाधनगृहांची उपलब्धतता याबाबतची खातरजमा करण्याच्या सूचनाही त्यांनी याप्रसंगी दिल्या.