हेमंत गोडसे, डॉ. भारती पवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

0

नाशिक – गेल्या महिन्याभरापासून महायुतीत रखडलेला नाशिकचा तिढा अखेर काल सुटला. शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हेमंत गोडसे हे सलग तिसऱ्यांदा नाशिकमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवीपासून नाशिक शहराकडे वाहनांची ‘महाविजय रॅली’ काढण्यात आली आहे. या रॅलीला शिवसैनिक आणि गोडसे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नाशिकमध्ये महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नाशिक शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार हे हायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहेत. महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज भर उन्हात इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावरून लक्षात येते की, नाशिक आणि दिंडोरीत दोघेही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याचा निर्धार नाशिककरांनी केला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

तर नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत अनेक दिवस जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र अखेर हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिकमधून हेमंत गोडसे यांना निवडणूक आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार आहोत. हेमंत गोडसे हे नक्कीच नाशिकमधून निवडून येतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech