जालना – लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील राजकारणाला वेग येताना दिसत आहे. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. यातच आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला होता.
सगेसोयरे तरतुदीसह अन्य काही मागण्यासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार होते. परंतु, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी मनोज जरांगे यांना आमरण उपोषण करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतीही कागदपत्र सादर न केल्यामुळे जरांगे यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.