(अनंत नलावडे)
मुंबई – महायुती सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपचे वरिष्ठ नेते, विद्यमान आमदार सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्टपणे नकार दिला असला तरी या पदासाठी सलग ९ वेळा निवडून आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार यांच्याच नावावर जवळपास शिक्कामोर्तबच झाल्याची माहिती एका ज्येष्ठ भाजप नेत्याने शनिवारी गप्पांच्या ओघात बोलताना दिली.
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी अध्यक्ष बनण्यासाठी इच्छा व्यक्त केली असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीमुळे शेलार यांचा पत्ता कट होण्याचीच शक्यता आहे. त्याऐवजी कोळंबकर यांच्याच नावाला भाजपाच्या शिर्सास्थ नेत्यांनीच अधिक पसंती दिल्याची माहितीही या नेत्यांने दिली. मात्र कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे हे पद दिले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी ठामपणे स्पष्ट केले.
महायुती सरकारमध्ये गृह खात्यासह विधानसभा अध्यक्ष पद मिळावे, अशी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची आग्रही मागणी होती.मात्र भाजपने ती फेटाळून लावत, अध्यक्षपद स्वतःकडे ठेवले आहे. सध्या विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू असून हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर कामकाज पाहत आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून नागपूर येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदारांचा शपथविधी होत असून कदाचित सोमावरी विधानसभा अध्यक्षपदाची नियुक्तीची घोषणा होण्याची शक्यता या नेत्याने वर्तविले. मात्र विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपकडून वरिष्ठ नेत्यांच्याच नावाला प्राधान्य देण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे अध्यक्ष पदाचा प्रस्ताव ठेवला. परंतु, दोन्ही नेत्यांनी त्याला स्पष्टपणे नकार दिल्याचेही या नेत्याने सांगितले.
महायुतीतील एकट्या भाजपचेच सर्वाधिक १३२ आमदार निवडून आले. त्यात इतर पक्षातून आलेल्या आमदारांची संख्या अधिक आहे. अशातच सभागृह चालविण्याचा अनुभव असलेले चेहरे कमी आहेत. त्यातच विद्यमान अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर मात्र या पदासाठी आग्रही आहेत.परंतु महायुती सरकारचा मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज केले त्याबद्दलच्या तक्रारी असल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नवा चेहरा पण तो ज्येष्ठ असावा याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्याने अखेर कोळंबकर यांच्याच नावाला फडणवीस यांनी आपली पहिली पसंती दिली आहे. कारण ॲड. नार्वेकर हे जरी कट्टर फडणवीस समर्थक असले आणि त्यांच्याही मनात ॲड. नार्वेकर हेच आहेत. मात्र वरून आदेश आलाच तर काय करायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. आता तसे पाहिले तर कोळंबकर हेही फडणवीस यांच्या गुडबुक मधील नेते आहेत. आणि त्यात कोळंबकर यांची जमेची बाजु म्हणजे तेही शिवसेना प्रमूख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहेत.कधीकाळी माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचेही ते नेते होतेच,त्यामूळे त्यांच्या नावाला एकनाथ शिंदे यांचाही नकार असण्याची शक्यताच नाही. कारण जर उद्या जरी समजा हे पद त्यांच्या पक्षाकडे गेले तरी त्यांच्याकडे याच पदासाठी अनेक दावेदार आहेत. त्यामूळे आज तरी स्व पक्षातील आमदारांची नाराजी ओढावून घेण्यास स्वतः शिंदे यांची तयारी नसून जर कालिदास कोळंबकर सारखा निष्कलंक नेता भाजप जर विधानसभा अध्यक्ष पदासाठी देत असेल तर शिंदेही त्याला अगदी हसतहसत मान्यताच देण्याची शक्यता अधिक असल्याने व खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत केलेल्या चर्चेनुसार कोळंबकर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता या नेत्याने यावेळी बोलताना व्यक्त केली.
………………………