मुंबई – विधान परिषद निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे कोणता १२ वा खेळाडू माघार घेणार याची चर्चा रंगली आहे. विधान परिषद निवडणुकीत महायुती आपला उमेदवार मागे घेणार नसल्याने महाविकास आघाडी कोणती भूमिका घेणार? याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आणि त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत दोन जागा जिंकून उद्धव ठाकरेंनी मोठा डाव खेळला आहे.
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना १२ वे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे ‘मॅन फ्रायडे’ मानले जातात. मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होंटिग होण्याची शक्यता बळावली आहे. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. ठाकरे कुटुंबियांशी अनेक दशकांपासून जवळचे आणि कौटुंबिक संबंध असलेले ते व्यक्ती आहेत. कठिण प्रसंगी, सेनेत मोठी बिघाड झाली तेव्हा ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले. मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून क्रॉस व्होटिंग होऊ शकते. नार्वेकर ही सर्व आमदारांच्या जवळची व्यक्ती आहे.
मिलिंद नार्वेकर ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या लोकांमध्ये सर्वात शक्तिशाली आहेत. मिलिंद नार्वेकर यांना विजयासाठी विधानपरिषद निवडणुकीत प्रथम पसंतीची २३ मतांची आवश्यकता आहे. नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना केवळ उद्धव ठाकरेच उपस्थित नव्हते, तर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्याचे आव्हान आहे.
शिंदे यांच्याशीही चांगले संबंध
मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेच्या फुटीनंतरचे असे नेते आहेत. ज्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही प्रत्यक्ष भेटले होते. नार्वेकर हे गेल्या दोन दशकांपासून उद्धव ठाकरेंचे पीए म्हणून कार्यरत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे एकूण १५ मते आहेत. अशा स्थितीत मिलिंद नार्वेकर यांचा विजय निश्चित करण्यासाठी पक्षाला आणखी आठ मतांची गरज भासणार आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर काही काळ पक्षात दुर्लक्ष झाले असले तरी अनेक महत्त्वाच्या प्रसंगी नार्वेकर हे उद्धव ठाकरेंसोबत दिसले आहेत.