शूर वीरांची भूमी ही महाराष्ट्राची ओळख, या भूमीला मी वंदन करतो

0

मुंंबई – देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सांगलीत सभा झाली. सांगली लोकसभेतील भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर आणि महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या सभेत योगी आदित्यनाथ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

शूर वीरांची भूमी ही महाराष्ट्राची ओळख, या भूमीला मी वंदन करतो…, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी भाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्रातील अनेक महापुरुषांच्या कार्याचा योगी आदित्यनाथ यांनी भाषणात उजाळा दिला. आतापर्यंतचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 2014 च्या आधी भारताचा देशभरामध्ये सन्मान होत नव्हता. ना शेतकरी, ना व्यापारी, ना मुली देशात सुरक्षित होत्या. 2014 नंतर परिस्थिती बदलली देशाची सीमा सुरक्षित झालीय. दहशतवाद पूर्णपणे नष्ट झालाय. भारतात कुठे बॉम्बस्फोट झाला. तर पाकिस्तान पहिल्यांदा स्पष्टीकरण देतो की आम्ही हे केलं नाही. देशातला शेतकरी आत्महत्या करत नाहीत. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केंद्र सरकार राबवत आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

काँग्रेसने राम मंदिराची उभारणी का केली नाही? आम्ही छेडणार नाही आणि सोडणारही नाही. राम मंदिराच्या उभारणीमुळे खुनाचे पाट वाहतील असे विरोधक बोलत होते. मात्र राम मंदिराच्या उभारणीमुळे एक मच्छर देखील मरणार नाही, हा विश्वास देतो. जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची घोषणा करून काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तर काँग्रेस जाती जातीत विभाजन करण्याचे काम करेल, असं घणाघात योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

जवानांसाठी अनेक योजना सरकार राबवत आहे. देशावर कुठले संकट आले तर राहुल गांधी पहिला देश सोडून जातात. कोरोना काळात राहुल गांधी इटलीला निघून गेले. राहुल गांधी परदेशात भारताचा अवमान करतात. सबका साथ सबका विकास पंतप्रधान मोदींचा मंत्र होता. त्यामुळे दहा वर्षात अनेक गोष्टी बदलून गेल्या. मोदींच्या नेतृत्वाखाली गडकरींनी अनेक हायवे बांधले. आज देशात दुप्पट हायवे झालेले आहेत. आधी पाच शहरांमध्ये मेट्रो धावत होती. आज 20 शहरांमध्ये मेट्रो धावत आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech