नवी दिल्ली : महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालानंतरच ठरणार, यावर महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे. महायुतीतील जागा वाटपाचा तिढा आणि तदानुषंगिक मुद्यांवर शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची दिल्लीत अमित शाहांसोबत चर्चा झाली. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा यावर अद्याप निर्णय झाला नसून यासंदर्भात, महायुतीकडून कोणत्याही नेत्याचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर केला जाणार नाही याची काळजी घेतली जावी, असे निर्देश अमित शाहांनी तिन्ही नेत्यांना दिले. तसेच निकालानंतर ज्याच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री होण्याबाबतही एकमत झाल्याचे समजते. महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांनी स्पष्ट केले होते की, आधी महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला की मग आमचाही चेहरा उघड करू. मात्र आता मुख्यमंत्री पदाच्या चेहर्याबाबतचे गूढ अजूनच वाढताना दिसत आहे.