सांगली : आमचं चुकलं काय? कधी न दिलेले आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले. उद्धव ठाकरे यांच्या काळात आरक्षण गेले. एकनाथ शिंदे यांच्या काळात दिले हे चुकलं का? राज्यात ७८ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या सगळ्यात आमची चूक झाली का? जरांगे समजून घेणार नसतील, तर सामान्य मराठा समाज समजून घेईल. जरांगेंनी खऱ्याला खरे म्हणायला शिकावे. आम्ही अजूनही कागदपत्रे घेऊन चर्चेला बसायला तयार आहे. आमचं काही चुकलं काय हे त्यांनी जाहीर करावं, असं प्रतिपादन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
वसंत देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, एखाद्या व्यक्तीनं म्हणणं हा त्या व्यक्तीचा दोष असू शकतो. ती आमच्या पक्षाची संस्कृती नाही. आपल्या बोलण्यात सर्वांनीच आदर व्यक्त केला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान विधानसभेत आमचाच विजय होईल असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात पराभूत १७ लोकसभा मतदारसंघातील १३० विधानसभा मतदारसंघात भाजपच पुढे आहे. त्यामुळे आम्ही पिछाडीवर आहोत असे म्हणणारे विरोधक हवेत आहे. याचा आम्हालाच फायदा होईल असेही ते म्हणाले.