रत्नागिरी – रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी विद्यादानाचे काम गेली १०० वर्षे सातत्याने करत आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणाऱ्या विविध करिअर संधींसाठी संस्थेची नेहमीच तळमळ राहिली आहे. या संस्थेला ज्या ज्या गोष्टीची गरज लागेल त्यासाठी मी कार्यकर्ता म्हणून उभा राहीन, अशी ग्वाही कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक बाबुराव जोशी यांच्या जयंतीनिमित्त गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. आज ज्यांचे सत्कार झाले ते एकेका व्यक्तीचे नव्हे तर त्या चांगल्या हेतूचा, भावनेचा सत्कार केला. असे आणखी सत्कारमूर्ती उभे राहावेत, यासाठी संस्थेने प्रेरणाज्योत, दीपस्तंभ उभे केले आहेत, असेही श्री. डावखरे यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, उद्योजक दीपक गद्रे, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर उपस्थित होते. कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी आमदार डावखरे आणि ज्येष्ठ उद्योजक दीपक गद्रे यांचा सत्कार केला. याप्रसंगी शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, ध्येयाने, चिकाटाने बाबूराव जोशी यांनी संस्था चालवली. पगार द्यायलासुद्धा पैसे नव्हते. त्यावेळी प्रतिष्ठित मंडळींच्या घरी जाऊन बाबूरावांनी देणग्या आणल्या, प्रसंगी घर गहाण ठेवले. अशा वैभवशाली संस्थेत आपण काम करतो आहोत. आज संकल्पाचा दिवस आहे. प्रत्येक शिक्षकाने आज संकल्प करावा. शिक्षकाला किमान एक हजार गोष्टी यायला हव्यात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपण घडवू शकतो. आई-वडील आणि शिक्षक मुलांना घडवत असतात. पुढील वर्ष हे जांभेकर विद्यालयाचे १०० वे वर्ष, कॉलेजचे ७५ वे वर्ष आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. जानेवारीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येण्याचे मान्य केलं आहे.
ज्येष्ठ उद्योजक दीपक गद्रे म्हणाले की, आजच्या काळात अनेक लोक फक्त पदवीसाठी धावतात. अनेकदा अपेक्षित नोकरी मिळत नाही. मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी म्हणजे फक्त परीक्षेसाठी नाही तर चांगले जीवन जगण्याकरिता तयार करावे. फक्त पुस्तकी ज्ञानाऐवजी मुलांना बोलण्याची सवय लावली पाहिजे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे नाव जगभरात आहे. प्रास्ताविकात सतीश शेवडे यांनी संस्थेला गेल्या वर्षभरात पंधरा कोटी रुपयांच्या शैक्षणिक देणग्या मिळाल्याचे सांगितले. त्याकरिता शिल्पाताईंनी भरपूर मेहनत घेतल्याचे ते म्हणाले. संस्थेच्या काही कामांकरिता आमदार डावखरे यांनी राजकीय ताकदही द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. संस्थेसाठी विविध देणग्या आणल्याबद्दल शिल्पाताई पटवर्धन यांचा विशेष सत्कार गद्रे व डावखरे यांच्या हस्ते करण्यात आला. जीजीपीएसच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. प्रा. महेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी आभार मानले. समारंभात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा कै. बाबूराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार बारटक्के इन्स्टिट्यूटमधील अमित सुभाष पालकर, मालतीबाई जोशी आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार ग्रंथालयातील सहाय्यक ग्रंथपाल उत्पल वाकडे यांना आणि मालतीबाई आदर्श सेवक पुरस्कार नामदेव सुवरे यांना देऊन गौरवण्यात आले.