मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

0

मुंबई : येणारी लोकसभेची निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी आहे. एक तर आपण खड्ड्यात तरी जाऊ किंवा वरती तरी राहू. त्यामुळे आज देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणूनच केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केले. मात्र, मनसैनिकांनी येत्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला जोमाने लागावे, असे आदेशही यावेळी राज ठाकरे यांनी दिले.

मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणाच्याही हाताखाली काम केले नाही, पुढे कधी करणारही नाही. मनसैनिकांच्या ताकदीवर हे इंजिन चिन्ह कमविले आहे ते कधीच सोडणार नाही. शिवसेना पक्षाचा प्रमुख वा अध्यक्ष होण्याचा विचारही मला कधी शिवला नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत येणार की नाही याची चर्चा सुरू होती. राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती. त्याचा सस्पेन्स कायम होता. शिवतीर्थावर आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी हा सस्पेन्स तोडला. फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. माझे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलणे झाले, मी त्यांना सांगितले, मला वाटाघाटी नकोत, राज्यसभाही नको, विधानपरिषदही नको, पण या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. मला कोणतीही अपेक्षा नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech