बीड – नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर देशातील संविधान बदलतील, असा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यासंदर्भात राजकीय वतुर्ळातही विविध चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या आरोपांना आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बीडमध्ये आयोजित महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “मी दलित समाजाला सांगतो की या देशाचं संविधान कोणीही बदलू शकत नाही. जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या पाठीत लाथ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मुळात या देशाचं संविधान ज्या लोकांनी बदललं तेच लोक आज संविधान बदलण्याचा आरोप करत आहेत”, असं प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी दिलं.
“बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर रोजी या देशाला संविधान सुपूर्त केलं होते. त्यादिवशी संविधान दिवस साजरा करण्याचा आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला. तेव्हापासून आज देशातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संविधान दिवस साजरा केला जातो आहे. काँग्रेसला हे कधीच सुचलं नव्हतं. तसेच बाबासाहेबांना भारतरत्न देण्याचं आणि त्यांचा फोटो सेट्रल हॉलमध्ये लावण्याचेही काँग्रेसला कधीच सुचलं नाही”, अशी टीकाही त्यांनी केली. “दिल्लीत ज्याठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, त्याजागी स्मारक बनवण्यासाठी मी अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांना भेटलो. मात्र, त्यांनी हा विषय कधीही गांभीर्याने घेतला नाही. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तिथे स्मारक बनवलं गेलं. मुंबईत ज्या इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक बनत आहे, ती जागा मोदी सरकारले महाराष्ट्र सरकारला दिली. त्यामुळे एवढी सगळी कामं करणारे नरेंद्र मोदी संविधान कसं बदलणार?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला.