मुंबई – उत्तर असो, दक्षिण असो किंवा पूर्व, पश्चिम असो भारतातील प्रत्येक भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील याचा विश्वास आहे, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ते यानिमित्त पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. यावेळी ते बोलत होते. भारत स्वातंत्र्यानंतर निकालाबाबत जनता आश्वस्त असल्याची ही पहिलीच निवडणूक आहे, असा दावाही त्यांनी केला.
”जागतिक पातळीवर भारताचा सन्मान वाढला आहे. भारताच्या पासपोर्टचे महत्त्व वाढले आहे, मात्र २०१४ पूर्वी असे चित्र नव्हते. सध्या भारताचा सीमावर्ती भाग सुरक्षित झाला आहे. यापूर्वी भारतामध्ये शेजारील देशातून मोठ्या प्रमाणात दहशतवाद पसरला जात होता, मात्र सरकार डोळे बंद करून त्याकडे पाहत होते, असा आरोप देखील योगी यांनी केला.” ते पुढे म्हणाले की, ”मुंबई हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तान मध्ये लपले आहेत. त्या पाकिस्तानमध्ये देखील आता दहशतवादी सुरक्षित नाहीत. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे घडले आहे.