मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे दहशतवाद मुक्त आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीरही भविष्यात भारताचा भाग होईल, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मुंबईत व्यक्त केला.उत्तर मुंबईतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईत आलेल्या डॉ. एस. जयशंकर यांनी बीकेसी येथील ‘एनएसई’मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. एस. जयशंकर म्हणाले, मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेली कामे जनतेसमोर आहेत. या कालावधीत पायाभूत सुविधा किती प्रमाणात वाढल्या आणि किती प्रगती झाली, ते मतदार अनुभवतो आहे. मोफत आरोग्य उपचार घर, मुद्रा कर्ज, आणि स्वनिधी यात मोठी वाढ होणार आहे. मोदींच्या काम करण्याच्या आणि आश्वासने पूर्ण करण्याच्या हमीवर भाजपा मतदारांचे आशीर्वाद मागत आहे.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याची बाजू मांडायचे काम कोणी केले,कोणती विचारधारा दहशतवाद्यांविरोधात लढतेय, याचा मतदारांनी विचार केला पाहिजे.
भाजपाच्या दहशतवादविरोधी धोरणामुळेच आज दहशतवादी कारवायांना आळा बसला आहे, असे डॉ. एस. जयशंकर म्हणाले.भाजपा सरकारने कलम 370 हटवण्याचे काम केले.परिणामी काश्मीरमध्ये सुधारणा होऊ लागल्या आहेत. आता पाकव्याप्त काश्मीरमध्येही काही घटना घडू लागल्या आहेत. एक दिवस तोही भारताशी जोडला जाईल, असा विश्वास डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केला.
भाजपा आणि महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर गती देणारे निर्णय घेतले.अनेक योजनांद्वारे व्यवसायवृद्धी घडवून आणल्याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले.आजमितीस देशात दररोज 28 किमी लांब महामार्ग आणि 14 किमी लांब रेल्वे मार्गाचे काम होते. दहा वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली. भारताच्या प्रगती आणि तंत्रज्ञानाचे संपूर्ण पॅकेज जनतेसमोर आहे. जनता त्याचा नक्कीच विचार करेल, असे डॉ. एस. जयशंकर यांनी नमूद केले.