मुंबई – लोकसभा निवडणूक 2024चा पाचवा टप्पा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा 20 मेला होणार आहे. अशामध्ये पाचव्या टप्प्यात आता मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील 15 मेला महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. ते 15 ते 17 तारखेपर्यंत मुंबईत विविध ठिकाणी सभा घेणार आहेत. तर, 15 तारखेला मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत रोड शोदेखील करणार आहेत. या रोड शोच्या निमित्ताने मुंबईतील अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अनेक मार्ग या कालावधीमध्ये बंद राहणार आहेत. १५ मेला दुपारी 2 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत मुंबईचा एल.बी.एस मार्ग बंद राहणार आहे. तसेच माहुल – घाटकोपर रोडवरील, मेघराज जंक्शन ते आर.बी कदम जंक्शनपर्यंत उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूला वाहतूक दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच, संपूर्ण एल.बी.एस मार्ग आणि त्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत 14 आणि 15 तारखेला नो पार्किंग करण्यात आला आहे.
अंधेरी घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर व दक्षिण वाहिनीवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच, गोळीबार मैदान व घाटकोपर मेट्रो असताना जंक्शन येणारी वाहतूक आणि हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्समधून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शनकडे येणाऱ्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिला दौऱ्यात घाटकोपर ते मुलुंड असा रोड शो करणार आहेत. यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून उभे राहिलेले मिहीर कोटेचा यांना याचा फायदा होणार आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे आव्हान असणार आहे.