मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यांच्या प्रचाराचा झंझावात राज्यात दिसून येणार आहे. येत्या १० एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदीरामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर १४ एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन व चंद्रपूर येथे जाहीर सभा नियोजित आहे अशी माहिती भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ५ किंवा ६ एप्रिल रोजी विदर्भात सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि शीर्षस्थ नेत्यांच्या सभांचेही वेळापत्रक लवकच जाहीर होईल असेही त्यांनी सांगितले.
निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, भाजपा हा पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत नियोजनबद्ध, कालबद्ध आणि समयसूचक काम करणारा पक्ष आहे. पक्षाची निवडणूक व्यवस्थापन समिती ही निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावत असते. आज महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीची बैठक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली. महाराष्ट्रात निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना काय आहे, कशा प्रकारची व्यवस्था, यंत्रणा उभी आहे. या यंत्रणेची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने होतेय याचा आढावा आणि मार्गदर्शक सूचना डॉ. दिनेश शर्मा यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून एकेकावर जबाबदारी देण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.