नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली ‘राज की बात’

0

मुंबई : लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राज्यात महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा रंगली होती. त्यातच, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार, मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी भूमिका जाहीर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मनसेचा भाजपला बिनशर्त पाठिंबा असल्याचे म्हटले. मनसेच्या पाठिंब्यांचे राज्यातील महायुतीकडून स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंचे आभार मानले. त्यानंतर, आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज ठाकरेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, राजकारणातील ‘राज की बात’ सांगितली.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजपने सरकार स्थापन केले. त्यानंतर, अजित पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेऊन सत्तेत स्थान दिले. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांसाठी भाजपा बेरजेचं राजकारण करत असल्याचं उघड झालं. त्यातच, मनसेनेही राज यांना पाठिंबा घोषित केल्यामुळे मनसेही अप्रत्यक्षपणे भाजपासोबतच आली आहे. याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्यात आला होता.

लोकांच्या मनात प्रश्न आहे की, भाजपला विजयाची एवढी खात्री होती तरी त्यांनी राज ठाकरे यांना सोबत का घेतले?, असा प्रश्न एका दैनिकांच्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राज ठाकरे आम्हाला नवीन नाहीत, असे मोदींनी म्हटले. मी आधी सांगितल्याप्रमाणे देशाला जो सर्वोच्य प्राधान्य देतो, त्याचे आम्ही नेहमीच स्वागत करतो. गेल्या १० वर्षापासून आम्ही स्वबळावर बहुमतात आहोत, मात्र, तरीही आम्ही कायमच नव्या मित्रांचे स्वागत केले आहे. आपल्या लोकशाहीसाठी हे चांगले आहे. अधिकाधिक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करणे केव्हाही चांगलेच असते, असे मोदींनी म्हटले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech