(सुचिता करमरकर)
ठाण्याचा गड आपल्याकडे कायम राखत शिवसेना शिंदे गटाने जेष्ठ कार्यकर्ते नरेश म्हस्के यांना ठाण्याची उमेदवारी जाहीर केली. मागील काही वर्षांपासून म्हस्के यांनी पक्षाला ठाणे जिल्ह्यात सत्तेच्या समीकरणात जे यश मिळवून दिले आहे त्याचेच हे फळ म्हणावे लागेल.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत विश्वासातील आपल्या कार्यकर्त्यावर ठाणे जिंकून आणण्याची जबाबदारी टाकत भारतीय जनता पक्षाला खणखणीत उत्तर दिले आहे असे म्हटल्यास वावगं ठरु नये. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पासून ठाणे कोणाला मिळणार या राजकिय चर्चा वेग धरु लागल्या होत्या. ठाणे महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेला एक हाती सत्ता मिळाली होती त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. भाजपा च्या कार्यकर्त्यांनी ठाणे मतदार संघावर दावा केला होता. या मतदार संघात आपली ताकद वाढली असल्याचा त्यांचा दावा होता. भाजपाच्या दबावाने सेनेने राज्यात काही ठिकाणी आपले घोषित तर काही वर्षानुवर्ष जिंकलेले उमेदवार बदलले. ठाण्यात मात्र मुख्यमंत्री कोणताही दबाव मानणार नाहीत ही अटकळ होती; आणि झालेही नेमके तसेच. ठाण्यातून नरेश म्हस्के, कल्याण मधुन डॉ श्रीकांत शिंदे तर नाशिक मध्ये हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातुन राजकारणात म्हस्के यांचा प्रवेश झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. मात्र राज यांच्या सोबत न जाता म्हस्के यांनी शिवसेनेत राहणे पसंत केले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मात्र म्हस्के प्रथम पासूनच ते शिंदे यांच्या सोबत होते. सूरत, गुवाहाटी या प्रवासातही त्यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली होती. स्वर्गीय आनंद दिघे याच्या काळापासून म्हस्के कार्यरत आहेत. मात्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे पक्षातील महत्व वाढले. ठाणे पालिकेत स्वीकृत नगरसेवक ते महापौर असा प्रवास त्यांनी केला आहे. एक तपाहून अधिक काळ ते पालिकेत पक्षाचा चेहरा म्हणुन कार्यरत राहिले. अर्थकारणातील त्यांचा प्रभाव सर्वज्ञात आहे. ठाणे, पालघर या परिसरात समन्वयाचे राजकारण करण्यात म्हस्के यांचा हातखंडा मानला जातो. याशिवाय पालिकेचा कारभार करतानाही त्यांनी सर्व पक्षीयांची मोट उत्तमरित्या बांधली होती.
२०१४ मध्ये शिवसेना भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत असताना म्हस्के ठाणे शहर मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यावेळी रविन्द्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी नाराज असलेले म्हस्के आजही ती खंत बोलून दाखवतात. मात्र सेनेबरोबर आणि कालांतराने शिंदे यांच्यासोबत राहत म्हस्के यांनी काम सुरुच ठेवले. आज त्यांना याचे फळ मिळाले असे त्यांच्या निकटवर्तीयांना वाटते. या काळात काहीजण त्यांच्यावर नाराज झाले. त्या सर्वांना सोबत घेत पुढे जाण्याचे आव्हान त्यांच्या पुढे आहे.
राजकारणात स्वकीय तसेच विरोधी गटातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन वाटचाल करणारे म्हस्के आता या निवडणुकीत कोणती रणनीती आखतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
( लेखिका ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार असून राजकीय विश्लेषक आहेत.)