पुणे- या देशातील लोकशाहीवर, संविधानाचे निर्माते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य-कर्तुत्वावर, घटनात्मक संस्थांवर, यंत्रणांवर, न्यायालयांवर शंका उपस्थितीत करुन विरोधी पक्षाना या देशाला अराजकतेकडे तर न्यायचे नाही ना? हे एक मोठे षंडयंत्र आहे का? हे तरुणांनो ओळखा, असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज पुण्यात केले.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज पुण्यातील महायुतीच्या तरुणांचा मेळावा पुण्यात घेण्यात आला. उद्योग मंत्री उदय सामंत आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी यावेळी प्रमुख मार्गदर्शन केले. या मेळाव्याला सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, महायुतीचे कार्यकर्ते ही लढाई निवडणूक म्हणून लढत आहेत, पण विरोधक एक युध्द म्हणून उतरले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने कालच सांगितले की, अति शंका घेऊ नका .. खरं तर अतिशंका हीच आपल्या देशा समोरची एक मोठी समस्या आहे.
या देशाचे संविधान तयार करण्यात सर्वोत मोठे योगदान भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे आणि हे या देशातील शाळकरी मुलालाही माहिती आहे. पण
काँग्रेस नेते श्याम पित्रोदा म्हणतात की, संविधान बनविण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा पंडित नेहरु यांचे योगदान मोठे आहे. हे जाणीव पुर्वक केले जातेय. तेच काँग्रेस आज संविधान बचाव म्हणून नारे देत आहे. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अमेरिका येथे जाऊन सांगतात की, भारतात लोकशाही धोक्यात आली आहे.
या देशात प्रथमच तीन न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन न्यायपालिकेवर प्रश्न निर्माण करतात, त्यानंतर शेतकरी कायद्यावर आंदोलन सुरु असताना जेव्हा सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधत होते तेव्हा ब्रिटिश पार्लमेंट मधील खासदार शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात, गडचिरोली मध्ये नक्षलवादी पत्रक काढून पाठिंबा देतात तर पाँप स्टार रिहाना पाठिंबा देतात…म्हणून हे काय चाललेय आपण समजून घेतले पाहिजे. हे एक षंडयंत्र आहे. कोण पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करतो तर ममता बॅनर्जी ईडी, आणि सीबीआय आपल्या राज्यात येऊ देणार नाही असे म्हणतात.. तर जग जेव्हा कोरोनाशी लढत होते तेव्हा आपल्या देशाने लस तयार करुन आघाडी घेतली पण त्या लसीला पण मोदी लस म्हणून हिणवले व प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हे सगळे वाटते तेवढे सरळ नाही. या देशातील यंत्रणा, न्यायपालिका, लोकशाही धोक्यात आली आहे असे देशाला खिळखिळे करणारे चित्र दुर्दैवाने विरोधक उभे करीत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक भारत श्रेष्ठ भारत, एक देश एक टँक्स, सबका साथ सबका विकास म्हणतात तेव्हा विरोधक त्यावरही प्रश्न उपस्थित करतात. म्हणून हे षडयंत्र तरुणांनी समजून घेतले पाहिजे, असे आवाहन करीत पुण्यातून मुरलीधर मोहोळ, बारामतीतून सुनेत्रा पवार आणि शिरूर मधून शिवाजीराव अढळराव पाटील हे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.