नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चेसाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत विरोधकांनी पुन्हा एकदा गोंधळ घातला. बैठकीत सादर प्रझेंटेशनवर आक्षेप नोंदवत विरोधकांनी सभात्याग केल्याची घटना आज, सोमवारी घडली. यापूर्वी तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जींनी बैठकीत काचेची बॉटल फोडली होती. संयुक्त संसदीय समितीसमोर हजर झालेले दिल्ली महापालिकेचे (एमसीडी) आयुक्त आणि दिल्ली वक्फ बोर्डाचे प्रशासक अश्विनी कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय वक्फ बोर्डाच्या सादरीकरणात बदल केल्याचा दावा विरोधी सदस्यांनी केला. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, द्रमुकचे खासदार मोहम्मद अब्दुल्ला, काँग्रेसचे नसीर हुसेन आणि मोहम्मद जावेद यांच्यासह इतर विरोधी सदस्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.जेपीसीने वक्फ दुरुस्तीवर चर्चा करण्यासाठी दिल्ली वक्फ बोर्ड, हरियाणा वक्फ बोर्ड, पंजाब वक्फ बोर्ड, उत्तराखंड वक्फ बोर्ड, कॉल फॉर जस्टिस आणि वक्फ टेनंट्स वेल्फेअर असोसिएशन, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या गटाला बोलावले होते.
या बैठकीत पुन्हा एकदा गदारोळ झाला. मात्र, सभात्याग करून सर्व खासदार काही वेळातच पुन्हा बैठकीत सामील झाले. आता जेपीसीची पुढील बैठक मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जेपीसीच्या मागील बैठकीत मोठा गोंधळ झाला होता. भाजप आणि टीएमसी नेत्यांमध्ये हाणामारी झाली. तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी जखमीही झाले. रिपोर्ट्सनुसार, कल्याण बॅनर्जी यांनी तिथे ठेवलेली काचेची बाटली उचलून टेबलावर मारली होती, त्यामुळे ते जखमी झाले. यानंतर कल्याण बॅनर्जी यांना समितीमधून निलंबित करण्यात आले.