पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग

0

पालघर – पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही शक्ती या भूमिकेस आव्हान देऊ शकणार नाही, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी व्यक्त केला. पालघर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचार सभेत बोलताना शाह यांनी काँग्रेस, इंडी आघाडी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. भाजपा प्रणीत एनडीए आघाडी पुन्हा सत्तेवर येणार असून इंडी आघाडीची सर्कस मोदींचा मुकाबला करू शकणार नाही, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, डॉ.राजेंद्र गावीत, महेंद्र पाटील, मनोज पाटील, भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक आदी यावेळी उपस्थित होते.

दहा वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि पुढील पंचवीस वर्षांच्या देशाच्या प्रगतीचा स्पष्ट आराखडा असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवून देशाची जनता देशाच्या समृद्धीची, विकासाची वाटचाल सुरू ठेवणार आहे, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे जनतेला संभ्रमित करणारी वक्तव्ये करत असले, तरी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवून देशाला समृद्धी मिळवून देणारी निवडणूक आहे हे लक्षात ठेवा, असे आवाहन त्यांनी पालघरवासीयांशी संवाद साधताना केले.
या सभेत बोलताना शाह यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचा संपूर्ण आलेखच जनतेसमोर मांडला. इंडी आघाडीकडे नेता नाही, सत्ता मिळाल्यास पंतप्रधान कोण होणार हे त्यांनाच माहीत नाही. त्यामुळे आळीपाळीने पंतप्रधानपदावर बसण्याचा त्यांचा इरादा आहे. आळीपाळीने देशाचे नेतृत्व करणारी व्यक्ती देशाचे नेतृत्व कसे करणार, कोणत्याही संकटातून देशाला कसे वाचविणार, देशाचा विकास कसा करणार, असा सवाल करून शाह म्हणाले, विकास आणि जनतेची सुरक्षा यांची हमी केवळ मोदी हेच देऊ शकतात. ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. देश कोणाच्या हाती सुरक्षित, समृद्ध राहणार याचा निर्णय जनतेला करावयाचा आहे. एका बाजूला 12 लाख कोटींचे घोटाळे करणारे काँग्रेस व इंडी आघाडी, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या उभ्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले नरेंद्र मोदी यांच्यातील ही लढाई आहे, असे शाह म्हणाले.

राम मंदिर, कलम 370, तिहेरी तलाक, याबाबत उद्धव ठाकरे बोलणार नाहीत, कारण ते काँग्रेस, शऱद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, असेही श्री.शाह म्हणाले. पदाच्या लालसेने दहशतवादी कसाबचे समर्थन करणाऱ्या लोकांसोबत जाताना उद्धव ठाकरे यांना लाज वाटत नाही का, असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधींनी वीर सावरकरांना विरोध केला, इंडी आघाडीचे नेते सनातन धर्माचा विरोध करतात, उद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे का, हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. खऱी शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण हे आता जनताच उद्धव ठाकरेंना दाखवून देईल, असेही ते म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech