मुंबई : महाराष्ट्रात आज पाचव्या टप्प्यातही इतर राज्यांच्या तुलनेत कमीच मतदान झाले. महाराष्ट्रात केवळ 55 टक्के मतदान झाले. मात्र यावेळी मतदार मोठ्या संख्येने मतदानाला येऊनसुध्दा असंख्य कारणांमुळे मतदान न झाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. कमी मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोगाचा वापर केला गेला, असा आरोप होऊन मतदानावरून घमासान झाले. आज सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यापासून ईव्हीएम मशीन बंद पडणे, वीज जाणे, यादीत नाव नसणे, मतदान केंद्रांत सोयी नसणे, मतदान प्रक्रियेला मुद्दाम विलंब लावणे असे प्रकार घडू लागले. याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात अशा तक्रारी कधीच आल्या नव्हत्या. या अडचणींमुळे मतदानाला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मतदानासाठी दोन-तीन तासांहून अधिक तासांचा वेळ लागत होता. त्यामुळे अनेक मतदार मतदान न करताच परत गेले. अनेक ठिकाणी मतदारांचे निवडणूक कर्मचाऱ्यांशी वादही झाले.
मतदान केंद्रात आत पोहोचल्यावर आयोगाचे प्रतिनिधी असंख्य प्रश्न विचारून भंडावून सोडत मुद्दाम वेळ काढत होते. ज्यामुळे मतदानाची प्रक्रिया संथ होऊन अनेकजण कंटाळून परत गेले, असाही आरोप मतदार करीत होते. शिवाय यावेळी मतदार यादीत नावच नाही असे हजारो मतदारांच्या बाबतीत घडले. मतदानात असा प्रकार पूर्वी कधीही झाला नसल्याचे मतदार सांगत होते. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरला की मुद्दाम घसरवला, असा प्रश्न करत विरोधकांनी एकूणच मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबईतील सहा मतदारसंघांत सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये झालेला बिघाड, मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी आल्यामुळे लागलेल्या लांबच लांब रांगा, मतदार यादीतील घोळ, तर कुठे खंडित झालेला वीजपुरवठा अशा विविध कारणांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळे आले. बोरिवलीतील अनेक मतदान केंद्रात ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना घडल्या. इथे पिण्याचे पाणी, अपंगांसाठी व्हिलचेअरची सोयच नसल्याने महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी तक्रार केली. संध्याकाळपर्यंत इथल्या काही मतदार केंद्रात मतदारांच्या 1 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. पवई हिरानंदानी येथील एका केंद्रात ईव्हीएम दोन तास बंद होते. त्यात शिंदे गटाचे दिलीप लांडे मतदान केंद्रात गेल्याने उबाठा गटाचे आदेश बांदेकर यांनी तक्रार केली.
जांबोरी मैदानात मतदार अनेक तास उन्हात उभे होते. मानखुर्द येथील बुथ क्रमांक 63 आणि 65 वरील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती. मतदान यंत्र तातडीने बदलण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. मुलुंड येथील बुथ क्रमांक 126 वरील मतदान यंत्रातही बिघाड झाला होता. भांडुप खिंडीपाडा परिसरातील मतदान केंद्रावरील वीजपुरवठा खंडीत झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली. अर्ध्या तासाहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने मतदान बंद पडले होते. मुलुंडमध्ये भाजपा कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याची तक्रार आल्याने वाद झाला. माहीममध्ये चेतना सावंत या महिलेने आपल्या नावाने बोगस मतदान झाल्याची पोलीस तक्रार केली.
घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी, बर्वेनगर, पारशीवाडी, चिरागनगर, माणिकलाल मैदान, जागृती नगर, श्रेयस दामोदर पार्क, अग्निशमन दल पार्कसाईट आणि विक्रोळी पार्कसाईट येथील मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्यानंतरही मतदान केंद्रांवर हीच परिस्थिती होती. विलेपार्ले येथील शहाजीराजे हायस्कूल येथे मतदानाला विलंब होत असल्याने अनेक मतदार घरी परतले. गोरेगावच्या बिंबिसार नगरमध्येही हेच चित्र होते. कल्याण, मुंब्रा भागात मतदारांची नावे गायब होणे, मतदानाला दिरंगाई, लांबच लांब रांगा असे प्रकार घडले. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातूनही अशाच तक्रारी दिवसभर सुरू होत्या.
मतदान केंद्रावर सावली नाही, प्यायचे पाणी नाही, पंखे नाहीत अशी तक्रार उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतदान संथ गतीने सुरू असल्याची तक्रार करत याकडे आयोगाने गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिली. मुंब्रा येथे मतदान संथ गतीने होत असल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड संतापले. ते म्हणाले की, मतदान प्रक्रियेला मुद्दामहून विलंब केला जातो आहे. त्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावली आहे. मुंबईव्यतिरिक्त कल्याण मतदारसंघातही लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याची तक्रार मतदारांनी केली. नाशिक आणि दिंडोरी येथेही मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदानाचा पाचवा टप्पा गैरव्यवस्थेमुळेच अधिक चर्चेत राहिला.
महाराष्ट्राची टक्केवारी- 49.01%
पालघर 54.32, भिवंडी 48.89, कल्याण 41.70, ठाणे 48.04,उत्तर मुंबई 46.91,दक्षिण मुंबई 44.63,उत्तर-पश्चिम मुंबई 49.79,उत्तर-पूर्व मुंबई 48.67, दक्षिण-मध्य मुंबई 48.80,उत्तर -मध्य मुंबई 47.46, नाशिक 51.16, दिंडोरी 57.07,धुळे 48.81. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतदान संथ गतीने सुरू असल्याची तक्रार करत याकडे आयोगाने गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिली.