मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आठवले यांनी 13 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा झंझावाती प्रचार करताना महाविकास आघाडीने महायुतीवर केलेले आरोप खोडून काढले. राज्यात रामदास आठवले यांनी वेगवान प्रचार करून 13 दिवसांत मुंबई ठाणे; कोकण; पश्चिम महाराष्ट्र; उत्तर महाराष्ट्र, पूर्व आणि पश्चिम विदर्भ; मराठवाडा असा सर्वच पिंजून काढत 50 पेक्षा जास्त सभा महायुतीसाठी घेतल्या. महायुती विरुद्ध माहविकास आघाडी असा रणसंग्राम राज्यात पाहण्यास मिळाला.निवडणुकीच्या या युद्धात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह महायुतीसह महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचे नेते प्रचारसभा पार पडल्या. या सर्व निवडणूक रणधुमाळीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे महायुतीची बुलंद तोफ ठरले.
महायुतीची बुलंद तोफ होऊन रामदास आठवले हे महाविकास आघाडीवर तुटून पडत होते. राज्यात महायुती चा प्रचार करताना कधी चार्टर्ड फ्लाईट तर कधी हेलिकॉप्टरने ते सभेला वेळेवर पोहोचत होते.पुण्यात ताडिवाला रोड येथे भाजप महायुती उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचार रॅलीत प्रचंड गर्दीत होती.तेथील गल्ल्या अरुंद होत्या.पुणे कँटोन्मेंटचा प्रचार आटोपून आठवलेंना पुढे सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी छत्रपती शिवाजी नगर येथे जायचे होते. ताडीवाला रोड वस्तीमध्ये गर्दी प्रचंड झाली होती. रस्ते म्हणजे छोट्या अरुंद गल्ल्यांतून वाट काढून बाहेर यायचे होते. त्यावेळी रामदास आठवले रिक्षात बसले सोबत पुण्याचे रिपाइं शहर अध्यक्ष संजय सोनवणे आणि रिपाइंचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे हे त्या रिक्षात बसले. त्या रिक्षातून रामदास आठवले यांनी ताडीवाला रोड वर महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांचा प्रचार करून मुख्य रस्त्यावर पंचशील चौकात आले तिथे त्यांच्या गाड्यांचा ताफा आला.
त्यानंतर पुढे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी छत्रपती शिवाजी नगर येथे पोहोचले. दलित बहुजनांचे संघर्षनायक आठवले हे मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत आजवर पुढे आलेले राष्ट्रीय नेतृत्व आहे.त्यांना भाजप महायुती ने या विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकचा दर्जा दिला नाही.तरीही महायुती च्या कोणत्याही स्टार प्रचारकापेक्षा अधिक सभांची मागणी हे रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्या सभांची होती. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील महायुती चे उमेदवार आपल्या मतदार संघात ना.रामदास आठवले यांची प्रचार सभा व्हावी, अशी आग्रही मागणी करीत होते.