रत्नागिरी – रत्नागिरीचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेंद्र तथा बाळ माने यांनी आज मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. महायुतीच्या जागावाटपात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, यासाठी बाळ माने बऱ्याच काळापासून प्रयत्नशील होते; मात्र काल रात्री उशिरा शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत रत्नागिरी मतदारसंघातून विद्यमान आमदार उदय सामंत यांनाच उमेदवारी जाहीर झाल्याचे स्पष्ट झाले.
काही दिवसांपूर्वी माने यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्या वेळी त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल चर्चा झाली होती; मात्र नंतर चित्रा वाघ यांनी माने भाजप सोडत नसल्याचे सांगितलं होते. मात्र आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे साडू गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी माने यांच्या पक्षप्रवेशासाठी प्रयत्न केले. नव्याने आलेल्यांना उमेदवारी द्यायची नाही, असे उबाठा शिवसेनेने ठरविले होते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर माने यांच्यासारखा नेता भाजपमधून आपल्या पक्षात आल्यामुळे माने यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.