उत्तर पश्चिमेत रवींद्र वायकरांचा विजय, शिंदेंनी मुंबईत खाते उघडले

0

मुंबई – अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी यंदा देशात सात टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले. त्यातही मुंबईत सहा लोकसभांमध्ये राज्यातील शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यात निवडणूक पार पडली. परंतु, मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये सायंकाळपासूनच मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. सायंकाळी सहा वाजल्यानंतर या मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर यांचा पराभव झाल्याची घोषणा करण्यात आली. परंतु, त्यानंतर झालेल्या फेरमतमोजणीमध्ये वायकरांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा पराभव करत 48 मतांनी विजय मिळवला आहे.

उत्तर पश्चिम लोकसभेत विजय मिळवल्यानंतर शिंदेंनी मुंबईतील सहा लोकसभांपैकी एका मतदारसंघामध्ये विजयाचे खाते उघडले आहे. ज्यामुळे आता मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून दोन जागांवर महायुतीच्या उमेदवारांना विजय मिळवत आला आहे. या मतदारसंघात अटीतटीची लढत झाली असून रविंद्र वायकर यांनी अवघ्या 48 मतांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. निकालानंतर रविंद्र वायकर यांनी माध्यमांना भावनिक प्रतिक्रिया दिली. आपण अमोल कीर्तिकर यांची माफी मागितली, असं रविंद्र वायकर म्हणाले.

उत्तर पश्चिम लोकसभेत विजय झाल्यानंतर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांची माफी मागत म्हटले की, मी अमोलची माफी मागितली. मी त्याला सॉरी म्हटले. कारण तो मला भेटायला आला. त्याच्यामध्ये मोठेपणा आहे. त्याने ते दाखवून दिले. मी त्यालासुद्धा सॉरी म्हटले. हे असे होतंच राहते म्हटले. पण या सर्वमध्ये माझे सर्व कार्यकर्ते जे शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे जी काही लोकं होती, यांनी जे जीवापाड प्रेम केलेले आहे त्यांचे उपकार मी फेडू शकत नाही, अशा भावना वायकरांकडून व्यक्त करण्यात आल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech