मेहकरमध्ये दंगल, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर

0

बुलढाणा : मेहकर विधानसभा मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागला असून मोठा उलटफेर झाला आहे. शिवसेना ठाकरे गट अर्थात महाविकास आघाडीचे सिद्धार्थ खरात विजयी झाले. मागील ३० वर्षांपासून येथे असलेले खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमूलकर यांचे वर्चस्व मोडून काढण्यात ठाकरे गटाला यश मिळाले आहे. यामुळे निकाल लागल्यापासूनच खदखद निर्माण झाली होती. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा याचे पर्यवसान दोन गटातील जातीय संघर्षांत झाले. २४ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा दोन समुदायात दंगल झाली. काही गाड्या पेटवण्यात आल्या असून दगडफेकही करण्यात आली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा देखील वापर करावा लागला.

मेहकर भागात दोन गटात काल रात्री उशिरा झालेल्या संघर्षानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मेहकर पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून आज सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत दोन्ही गटाच्या २५ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान मेहकर नगर परिषद हद्द बंद करण्यात आली असून कुणालाही प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सध्या पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झालेल्या मेहकर नगरीत तणाव पूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर व अन्य ठिकाणाहून पाचारण करण्यात आलेल्या पोलीस दलाने तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रदीप पाटील यांनी सांगितले की, मेहकर नगरपरिषद सीमा सील करण्यात आली आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सोमवार सकाळपासूनच पोलिसांनी अटक मोहीम सुरू केली. त्यात दुपारपर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान रात्रीपासूनच मेहकर शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. मेहकर शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून बाहेरच्या नागरिकांना शहरात प्रवेश करण्यास देखील मनाई करण्यात येत आहे. दरम्यान समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech