मुंबई : काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले संजय निरुपम आता शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. संजय निरुपम 3 मे रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संजय निरुपम यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. संजय निरुपम 20 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी करणार आहे. 20 वर्षानंतर शिवसेनेत घरवापसी होत असल्याचं आनंद यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.
संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, पुढे काय करायचं यावर विस्तृत चर्चा झाली. परवा 3 ते 4 वाजता शिवसेना पक्षात प्रवेश करणार, पुढील माहिती तुम्हाला पक्षाकडून भेटेल, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट आणि चर्चा झाल्यानंतर संजय निरुपम यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.
आज मी बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलावण्यावर त्यांची भेट घेतली. त्यांची भेट घेतल्यावर पुढे काय आणि कसं काम करायचं यावर सविस्तर चर्चा झाली. 3 जानेवारीला दुपारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. शिवसेना पक्षात प्रवेश केल्यावर पक्षाच्या सर्व उमेदवारांचा जोरदार प्रचार करणार. शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी प्रयत्न करणार, असल्याचं संजय निरुपम यांनी सांगितलं आहे. संजय निरुपम उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. आता निवडणूक लढणार का या प्रश्वावर उत्तर देताना संजय निरुपम म्हणाले की, आता कुठे निवडणूक लढणार? नेहमी तुमच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. कभी किसी को मुक्कमल जहाँ नही मिलता.
संजय निरुपम म्हणाले, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे मुंबईत किंवा राज्यात जे मतदार आहेत, त्यांचा जोरदार प्रचार करणार. पक्षाचा आदेश असेल, तिथे जाऊन उमेदवारांचा प्रचार करणार. शिवसेनेत प्रवेश होतोय, ही खूप आनंदाची बाब आहे. 20 वर्षांनंतर ही माझी घरवापसी आहे, 20 वर्षांपूर्वी ते माझं घर होतं. आता 20 वर्षांनंतर पुन्हा मी माझ्या घरात प्रवेश करणार आहे, असंही निरुपम यांनी म्हटलं आहे.