शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पदच…..?

0

भाजप नेते खा.नारायण राणे यांची टीका

मुंबई – अनंत नलावडे
मराठा आरक्षण असो की पुतळा प्रकरण खा. शरद पवार यांची प्रत्येक कृती संशयास्पदच असते.मराठ्यांच्या आरक्षणाबाबतही ते राजकारणच करत असून से वय वर्षे ८३ पर्यंत ते स्वत:च्या जातीलाही न्याय देऊ शकले नाहीत.या वयातही महाराष्ट्रात शांतता,सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील तर नाहीच पण आजही लावालावी करत आणि जातीजातीत भेद निर्माण करत आहेत,अशा सणसणीत शब्दात माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी सोमवारी येथे पवारांवर टीकास्त्र सोडले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी मुंबईत राज्य सरकारच्या विरोधात ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. त्यावरून खा.राणे यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांना चांगलेच लक्ष्य केले.

चारवेळा मुख्यमंत्री असताना आणि केंद्रात मंत्री असतानाही त्यांनी आरक्षणाची टक्केवारी का वाढवली नाही? असा सवाल करत राणे यांनी छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोककल्याण कारी बनावा हे पवारांच्या ध्यानीमनीही असायला हवे.शरद पवारांनी बोलायला हवे की, वाद नको,मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो आपण नव्याने पुतळा उभारावा.पण पेट्रोल टाकूनच ठेवायचे आणि काडी घेऊन फिरायचे,याला महाराष्ट्रात स्थान नाही, अशा परखड शब्दात खा.राणे यांनी पवारांना बजावले.

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी राजकारण कशाला करता? शांततेत मोर्चा का काढत नाहीत? त्यापेक्षा देखणा पुतळा आपण तयार करूयात,असे शरद पवार-उद्धव ठाकरे बोलले असते तर त्यांची कीर्ती वाढलीच असती, असा सल्ला देत उलट मला फोन करून शिवीगाळ करणारा शरद पवारांचा कार्यकर्ता निघाला आहे. त्यामुळे वातावरण बिघडवणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही खा.राणे यांनी यावेळी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे हे दुर्दैवीच असून या पुतळ्यावरून महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेटआउट करा म्हणणारे उद्धव ठाकरे यांना राज्यातील जनतेनेच सत्तेतून गेटआऊट केले असा मार्मिक टोलाही खा.राणे यांनी लगावला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech