सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर पंढरपूर आणि माढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर खलबते झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पवार गटाकडून पंढरपूर मतदारसंघात भगिरथ भालके यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेसच्या यादीत भालके यांचे नाव आले. पवार गटातील काही नेते प्रशांत परिचारक यांच्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते. मोहिते-पाटील गटाकडून कोणाला समर्थन मिळेल याबद्दल उत्सुकता आहे. माढ्यातून अभिजीत पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा दोन दिवसांपूर्वी होती. परंतु, माढ्यातील पवार गटाच्या नेत्यांनी या उमेदवारीला विरोध केला. मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्य माढ्याच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. पवार गटातील नेते मात्र आमदार बबनराव शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व विषयांवर सिल्व्हर ओकवर चर्चा झाली. आ. बबनराव शिंदे रात्री बारामती येथे शरद पवार यांना भेटल्याचे सांगण्यात आले.