विधिमंडळ पक्षाचे गटनेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर पदाधिकारी निवडण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने संमत..
मुंबई : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. तर सिद्धेश कदम यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गट नेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर नेत्यांची निवड करण्याचे सर्वांधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. या बैठकीला ऑनलाइन उपस्थित असलेले आमदार आणि कार्यकरिणीतील इतर सर्व सदस्यांनी या दोन्ही प्रस्तावांना अनुमोदन देऊन याबाबतचे सर्वांधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेतला.