मुंबई – कर्नाटकमधील माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा याच्या सेक्स स्कँलडचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत चांगलाच तापला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. देवेगौडा यांचा सुपुत्र असल्याने इंडिया आघाडीकडून प्रज्जल रेवण्णा प्रकरणावरुन जोरदार हल्लाबोल केला जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून देशाबाहेर फरार झालेल्या प्रज्वल रेवण्णाला भारतात आणण्याची मागणी केली आहे. आता, महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रज्वल रेवण्णाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या जाहिरातींचा उल्लेख करताना A प्रमाणित असलेल्या उल्लू अॅपचा दाखला दिला. आता, शिवसेना ठाकरे गटाच्या दोन नेत्यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
शिवसेना उबाठा पक्षाने महिला अत्याचारासंदर्भाने एक जाहिरात निवडणूक कॅम्पेनिंगचा भाग म्हणून प्रसिद्ध केली आहे. चित्रा वाघ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या जाहिरातीचा दाखल देत शिवसेना उबाठा व आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. महिला अत्याचाराच्या संबंधी प्रसिद्ध केलेल्या या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले असून त्यात महिलांचे शोषण करतो. मग, अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. आता, वाघ यांच्या विधानावरुन शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पलटवार केला आहे.
प्रज्वल रेवण्णा यांच्या आजोबांचा पक्ष असलेला जनता दल सेक्युलर हा लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीत आहे. त्यामुळे, भाजपसाठी हा मुद्दा अडचणीचा ठरत असून थेट मोदी-शाह यांना उद्देशून इंडिया आघाडीकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच, सुषमा अंधारे यांनी ट्विट करुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला.