बाळापूर मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार!

0

अकोला – अकोला जिल्ह्यातील मतदारसंघावरून महायुतीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर भाजपच्या वाट्याला चार मतदारसंघ आले तर एक मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला मिळाला. त्यामुळे अकोल्यातील बाळापूर येथील लढतीचे चित्र जवळपास निश्चित झाले आहे. बाळापुरात आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. अकोला जिल्ह्यातील तीन मतदारसंघातील लढतीचे चित्र जवळपास निश्चित झालं आहे. अकोल्यातील बाळापूर मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीही मैदानात आहे. जवळपास या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झालं असलं तरी अद्यापही एमआयएम ची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. या मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आहे. हा मतदारसंघ भाजपला सुटणार अशी शक्यता होती. मात्र भाजपमधून आयात केलेले माजी आमदार बळिराम सिरस्कार यांना अखेर शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून पुन्हा आमदार नितीन देशमुख लढणार आहेत. तर वंचितने येथे मुस्लिम उमेदवार देत लढत आणखी रंगतदार केल्याची चर्चा आहे. वंचितकडून या मतदारसंघात नतिकोद्दीन खतीब यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तिहेरी लढतीचे चित्र निश्चित!
अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र जवळपास निश्चित झालं आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. तर नितीन देशमुख यांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागली आहे. तर वंचितने मुस्लिम उमेदवार दिल्याने मतांचे समीकरण बदललं आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतदार हे निर्णयाक आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात एमआयएम ने दिलेला मुस्लिम उमेदवार हा शिवसेनेच्या पथ्यावर पडला होता. या मतदार संघात मुस्लिम, दलित मतांचे एमआयएम व वंचित बहुजन आघाडीमध्ये विभाजन झाल्यामुळे सेनेला एकगठ्ठा हिंदू मतांचा लाभ झाला होता. सुरूवातीला भाजप-सेना, वंचित बहुजन आघाडी आणि महाआघाडीमध्ये तिरंगी लढत दिसत होती. परंतु एमआयएमने राजकीय वातावरण तापवत, ही लढत चौरंगी केली. याचा लाभ थेट भाजप-सेना युतीला झाला होता. आता वंचितकडून नतिकोद्दीन खतीब यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत वेगवेगळी गणिते मांडली जात आहेत.

दोन्ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढत!
बाळापूर मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी प्रतिष्ठेची लढत होणार आहे. शिवसेनेतील फुटीच्या वेळी सुरूवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला ( आसाम ) जाऊन पुन्हा उद्धव ठाकरे यांना साथ देणारे आमदार नितीन देशमुख त्या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात चर्चेत आले. ठाकरेंना साथ दिल्यानंतर आमदार देशमुख यांना टक्कर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून या मतदार संघावर दावा केला जात होता. अखेर भाजपच्या नेत्याला आयात करत शिवसेना शिंदे गटाने शिवसेना ठाकरे गटाला मात देण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे या मतदारसंघात ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech