कर्नाटक – माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर जनता दल सेक्युलरने (जेडीएस) प्रज्वल रेवण्णा यांचे पक्षातून निलंबन केले आहे. माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मंगळवारी जेडीएसच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रज्वल रेवण्णा यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा झाली. यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जेडीएसच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रज्वल रेवण्णा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, या सेक्स स्कँडल प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तो पर्यंत प्रज्वल रेवण्णा यांचे निलंबन कायम राहणार आहे. याबाबत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी माहिती दिली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषद घेत प्रज्वल रेवण्णा यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यावेळी “एसआयटीचा तपास होईपर्यंत प्रज्वल रेवण्णा यांचे निलंबन कायम राहिल. आम्ही कधीही चूक करणाऱ्याचा बचाव करणार नाही आणि केलेला नाही. पण या वादात माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नाव घेणे चुकीचे आहे”, असे कुमारस्वामी म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर परदेशात पलायन केल्याचे समजते. याप्रकरणी एका भाजपाच्या नेत्याने प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात सेक्स स्कँडलचे आरोप केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे.
दरम्यान, प्रज्वल रेवण्णा हे हसन मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार आहेत. तसेच, यंदाच्या लोकसभेत या सेक्स स्कँडल प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटक पोलिसांनी सेक्स स्कँडल प्रकरणाची चौकशी एसआयटीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष चौकशी पथकाकडून या संदर्भात दाखल तक्रारींची चौकशी करण्यात येणार आहे.