नागपूर – उद्धव ठाकरे यांना कॉंग्रेस किती बेईमान आहे, हे आता कळले असेल. महाविकास आघाडीमध्ये खरी लढाई मुख्यमंत्रीपदासाठी सुरू आहे. काँग्रेस आणि शरद पवारांना जेवढा उद्धव ठाकरे यांचा वापर करायचा तर तेवढा केला. मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावे लागेल या भीतीने महाविकास आघाडीचे मेळावे बंद झाले आहेत, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. ते म्हणाले, “ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, परंतु, कॉंग्रेस आणि शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाहीत. मविआ मुख्यमंत्री पदासाठी तर महायुतीमधील घटक पक्ष राज्यातील १४ कोटी जनतेच्या कल्याणसाठी सरकार आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.’
गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्रात
नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधतांना बावनकुळे म्हणाले की, येत्या २४ व २५ सप्टेंबर रोजी भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. अमित शाह यांची २४ तारखेला नागपूर येथे विदर्भ, संभाजीनगर येथे मराठवाडा आणि २५ तारखेला नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र तर कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद बैठका होत आहेत. यातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक विषयक दिशा स्पष्ट होईल. ग्रामपंचायतींचे आर्थिक बळकटीकरण व्हावे यासाठी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या विकासकामांची मर्यादा ३ लाखावरून १५ लाख केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल.