भंडारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे काल महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाच पराभव झाला आहे. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून पराभव झाला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे. तर लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे. तिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा 10 हजार मतांनी पराभव झाला आहे. विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया जिल्हा हा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा मानला जातो. अतीतटीच्या लढाईत नाना पटोले यांचा शेवटच्या क्षणी निसटता विजय झाला आहे. त्यामुळे सेनापती पराभूत होण्यापूर्वी सावरले असल्याची चर्चा रंगतेय…
काल पर्यंत मुख्यमंत्री पदाचे दावेदारी करणारे नाना पटोले यांना दारून पराभव टाळण्यासाठी निसटता विजयाचा स्वीकार करावा लागला. सेनापती पराभूत होण्यापूर्वी सावरले अशी अवस्था महाविकास आघाडीच्या या ठिकाणी झाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांना स्वताच्या जिल्ह्यात स्वतः व्यतिरिक्त एकही सीट काढता आली नाही. त्यामुळे नाना पटोले प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे निकाल अतिशय धक्कादायक असल्याची भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आहेत.