(अनंत नलावडे)
मुंबई -मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजनेवर शिक्कामोर्तब केल्याने विरोधकांना सणसणीत चपराक बसली असल्याचे शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या डॉ.मनीषा कायंदे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु राहणार असून रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वात लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री भावाची भेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटन्ट यांच्या माध्यमातून वकील ओवैस पेचकारी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसह इतर योजनांचा शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडेल, अशी शंका उपस्थित करत त्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होती.मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून न्यायालयाने महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणांवर शिक्कामोर्तब केले असल्याचेही डॉ.कायंदे यांनी ठामपणे या निर्णयाचे जाहीर समर्थनही केले.
कायंदे पुढे म्हणाल्या की,समाजातील गरजू महिलांना दरमहा १५०० रुपये साह्य देणारी योजना अतिशय लोकप्रिय झाली आहे.या योजनेमुळे सरकारची प्रतिमा उंचावली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली आहे.त्यामुळे विरोधकांचा पोटशूळ उठल्याने,या योजनेच्या विरोधात, विरोधकांच्या मदतीनेच याचिका दाखल करण्यात आली होती.मात्र न्यायालयाने हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असून यावर हस्तक्षेप करता येणार नसल्याचे सांगून याचिका फेटाळली. या निर्णयाबाबत न्यायालयाचे आभार मानत असल्याचेही त्यांनी येथे ठासून नमूद केले.
…………………….(समाप्त)…….