मुंबई – कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले नाहीत, कसाबने आमच्या वीर पोलीस अधिकाऱ्यांना मारलं नाही, शहीद केलं नाही, या पद्धतीची जी पाकिस्तानची भूमिका आहे तीच काँग्रेसची भूमिका का आहे? जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय? असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केला. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी ॲड. उज्वल निकम यांच्या विरोधात केलेल्या विधानाची तक्रार मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली असून त्यांनी वड्डेटीवार आणि काँग्रेसवर कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत वांद्रे पश्चिम येथील निवडणूक कार्यालयात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार ॲड. आशिष शेलार यांनी माहिती दिली. यावेळी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्वल निकम उपस्थित होते. माझ्याकडे बरीच माहिती आहे. माझ्या पोतडीत बरेच काही आहे पण देशहित माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी, काही बोलत नाही, असा गर्भित इशारा ॲड. उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसला दिला आहे. तसेच विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केलेले आरोप बिनबुडाचे निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. वड्डेटीवार पाकिस्तानला जे हवेय तेच का बोलत आहेत, असा सवालही ॲड. निकम यांनी केला.
यावेळी आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले की, विरोधी पक्षनेते वड्डेटीवार यांनी संशय निर्माण करणारी विधान केली, जी न्यायालयीन निवाड्याच्या विरोधातली आहेत, जी सत्य घटनेवर आधारित नाहीत, ती खोटी आणि असत्य आहेत आणि म्हणून केवळ मतांच्या लांगुलचालनासाठी या पद्धतीचे विधान केले गेले आहे. हे विधान बदनामी करणारे असून भावना भडकवण्याचा आणि या निवडणुकीमध्ये असत्य पसरवण्याचा प्रयत्न करणारे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षावर आणि वड्डेटीवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशा पद्धतीची तक्रार आम्ही मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे असे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.