जर ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत तर कारवाई करा,धमक्या कसल्या देता ? नाना पटोले यांचे फडणवीस यांना आव्हान

0

 

(अनंत नलावडे)

– भाजपचे सरकार ईडी,सीबीआय,आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे काम करत असल्याचे उघड झाले असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात त्याप्रमाणे जर तुमच्याकडे विरोधकांच्या ऑडिओ,व्हिडिओ क्लिप असतील तर त्या उघड करुन कारवाई करा,धमक्या कसल्या देता,असे खुले आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री फडणवीस यांना दिले.

पटोले म्हणाले की,नाईलाजाने मला पक्षबदल करावा लागला असे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगितले.कारण ते व एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी ईडीच्या धाकाने भाजपाच्या गळाला लागले आहेत,तोच प्रयोग माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही केला असेल,त्या गोष्टींचा ते खुलासा करत असून गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे काही ऑडिओ व्हिडिओ क्लिप असतील तर त्यांनी कारवाई केली पाहिजे,त्यांना अडवले कोणी.निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्त विधाने करून काय उपयोग,अशी विचारणाही पटोले यांनी केली.

आजच्या परिस्थितीत राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली असून राज्य़ात ड्रग्ज आणून तरूणपिढी बरबाद केली जात आहे,ड्रग्ज माफियांना ससूनमध्ये व जेलमध्ये फाईव्ह स्टार सुविधा दिल्या जात आहेत,त्यावर मात्र ते काही बोलत नसून गृहमंत्रीपदाचा उपयोग काय फक्त विरोधकांना धमकवण्यासाठी करत आहात काय,असाही सवाल पटोले फडणवीस यांना केला.

आमदारांना निधी देण्यासाठी पैसे काय सरकारी जमिनी विकून आणू काय ? असे अर्थमंत्री अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणाल्याची चर्चा असून महायुती सरकारने राज्य गहाण ठेवले आहे, हे आम्ही म्हणत होतो त्याला जणू अर्थमंत्री पवार यांनी दुजोराच दिला आहे.या सरकारने राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे.विकासाच्या नावाखाली कर्ज काढले,पण विकास फक्त सत्ताधारी लोकांचा झाला.समृद्धी महामार्गावर अपघात होत असून २० वर्ष या महामार्गाला काहीच होणार नाही असा दावा जे करत होते,त्यावर आता खड्डे पडले,भेगा गेल्या आहेत. ५५ हजार कोटी रुपयांच्या या महामार्गातून सत्ताधारी पक्षातील लोक व त्यांच्या बगलबच्च्यांचीच समृद्धी झाल्याचा थेट आरोपही पटोले यांनी केला.

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन ढेपाळले..

राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे.मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे,नागपूर,भंडारा, गोदिया,कोल्हापूर,येथे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना सरकारचे आपत्ती व्यवस्थापन ढेपाळले आहे.एवढी गंभीर परिस्थीती होत असताना सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत होते.पुण्यातील लोकांना तातडीने मदत मिळाली पाहिजे तसेच राज्यात कोठेही संकट ओढवले तर तात्काळ यंत्रणा पोहचल्या पाहिजेत, याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणीही पटोले यांनी केली.
……………………

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech