मविआत कोणतेही मतभेद नाहीत

0

एक-दोन दिवसात जागा वाटपही पूर्ण होईल.! रमेश चेन्नीथला यांचा दावा…

मुंबई – अनंत नलावडे

महा विकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून विधानसभेच्या निवडणुका मविआ एकत्रच लढवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातही वाद नाहीत.मात्र तिन्ही पक्ष मिळून जागा वाटपाची चर्चाही सुरु असल्याने ही चर्चाही एक दोन दिवसात पूर्ण होईल, असा दावा राज्याचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची व महाविकास आघाडीची प्रकृत्तीही उत्तम असल्याची मार्मिक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

चेन्नीथला यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान,आ.भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे,शिवसेना खा. संजय राऊत उपस्थित होते.त्यानंतर चेन्नीथला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

दुपारी टिळक भवन येथे चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँगेसच्या प्रमुख नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली.या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील,माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. विश्वजित कदम आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,महायुतीचा चेहरा कोण आहे त्यांनी जाहीर करावे असे आम्ही सातत्याने विचारत होतो.पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास ते त्यावेळी घाबरले.त्यात सत्तारुढ भ्रष्ट महायुती सरकारने महाराष्ट्र विकायला काढला असून जमिनी विकत आहेत. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून योजनादूत च्या नावाखाली जनतेच्या पैशावर हे सरकार भाजपाचा प्रचार करत आहे.मात्र काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर योजनादूत सह सरकारने घेतलेले अनेक निर्णयही रद्द केले, याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

पांचज्यन या रा.स्व.सं.च्या मुखपत्रात बाबा सिद्दीकींचा कुख्यात माफिया दाऊदशी संबंध जोडलेल्या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता पटोले म्हणाले की, दाऊद असो किंवा देशभरातील कोणताही गुन्हेगाराने भाजपात प्रवेश केला तर ते स्वच्छ होतात व संघही त्यांचे स्वागत करते.ज्यांच्या विरोधात गाडीभर पुरावे होते ते भाजपात आले, ज्यांना चक्की पिसिंग करणार होते त्यांना भाजपात घेतले त्यावर संघ काहीच बोलला नाही.आता भाजपा सरकारबरोबर बाबा सिद्दीकीही आले, एकनाथ शिंदे आले व ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी संघ का बोलला नाही. आता बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर त्यांचा दाऊदशी संबंध दाखवण्याचा प्रयत्न ते का करत आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नबाव मलिक यांच्यावरही भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होताच. मात्र त्याच नवाब मलिक यांचे मतदान भाजपाला चालते. त्यामुळे भाजपाचे व संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा आरोपही यावेळी पटोले यांनी केला.

आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या वरिष्ठ निरिक्षकांची बैठक दुपारी टिळक भवन येथे पार पडली.या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चाही करण्यात आली.या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहेलोत,छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल,पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेश कार्याध्यक्ष काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, कर्नाटकचे मंत्री जी. परमेश्वरा, एम.बी.पाटील,तेलंगाणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी,दरासरी अनुसया सिताक्का, टि.एच.सिंग देव, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य खा.नासीर हुसेन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा.वर्षा गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते अशी माहितीही पटोले यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech