‘हे तर सरकारी माध्यमांचे भगवीकरण’

0

मुंबई – सरकारच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या प्रसार भारतीने आपली हिंदी वृत्तवाहिनी डीडी न्यूजच्या लोगोचा लाल रंग बदलून तो भगव्या रंगात बदलल्यामुळे अनेकांकडून टीका होत आहे. सत्ताधारी भाजपाकडून सरकारी माध्यमांचे भगवीकरण सुरू असल्याचा आरोप विरोधक आणि माध्यमात काम करणाऱ्यांनी केला. १६ एप्रिल रोजी दूरदूर्शनने सोशल मीडियावर या नव्या लोगोची झलक दाखविली. यासोबतच डीडीने एकूणच ब्रँडिग, स्टुडिओ आणि बातम्यांच्या सादरीकरणामध्ये मोठे बदल केले आहेत.

प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. लोगोचा रंग भगवा नसून नारिंगी आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी जी२० शिखर परिषदेच्या आधी आम्ही डीडी इंडिया या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या लोगोतही अशाच प्रकारे बदल केले होते. आता एकाच समूहाच्या दोन्ही वृत्तवाहिनीच्या लोगो आणि इतर डिझाईनला एकसारखे करण्यात आले आहे, असे गौरव द्विवेदी म्हणाले.

इंग्रजी आणि हिंदीमध्ये मनोरंजन आणि बातम्यांचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या डीडी नॅशनलचाही लोको मागच्या वर्षी केशरी / नारिंगी आणि निळ्या रंगात बदलण्यात आला होता, असेही द्विवेदी म्हणाले. फक्त लोगोचा रंगच नाही तर आम्ही स्टुडिओ आणि बातम्यांच्या सादरीकरणाच्या ग्राफिक्समध्येही बदल केल्याचे ते म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech