(अनंत नलावडे)
मुंबई – महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी अलीकडेच बारामतीला जावून आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख खुद्द शरद पवारांवर यथेच्छ तोंडसुख घेतले होते त्याच भुजबळांनी त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन आरक्षावरून राज्यात चिघळलेल्या वातावरणात मध्यस्थी करण्याचे घातलेले साकडे अनेकांच्या पचनी पडले न्हवते. त्याच प्रश्नावरून गुरूवारी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे नेते व खा. संजय राऊत यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना भुजबळांवर चांगलेच तोंडसुख घेत आपली खोचक प्रतिक्रिया दिली.
खा.राऊत यांनी यासंदर्भात आज प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, छगन भुजबळ हे उत्तम नाटककार आहेत. त्यांनी अनेक चित्रपटां मध्येही काम केलेले असल्याने ते एक चांगले नाटकही करू शकतात. मात्र शरद पवार हे राज्य व केंद्राच्या स्तरावरच्या राजकारणात एक दखल घेण्याजोगे नटसम्राट आहेत हे भुजबळांनी लक्षात ठेवावे, असा खोचक टोलाही त्यांनी भुजबळ यांना लगावला.
खरंतर लाडक्या बहिणीला १० हजार रुपये द्यायला हवेत…
राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ योजनेवरही खा. राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत परखड शब्दात भाष्य करत महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अशा नवनव्या योजना त्यांना आणाव्या लागत आहेत. आता लाडका भाऊ योजनाही आणली आहे. या योजनेत बेरोजगार बारावी पास भावाला ६ हजार तर पदवीधर भावाला १० हजार रूपये देणार. मग लाडक्या बहिणीलाही १० हजार रुपये द्याना. कारण ज्या लाडक्या बहिणीला हे नाममात्र १५०० रुपये महिना देणार आहेत इतक्या तुटपुंज्या रकमेत तिने आपले घर कसे चालवावे. अगदी मुख्यमंत्री शिंदे यांची बहीण तरी इतक्या कमी रकमेत आपले घर चालवू शकेल का असा रोखठोक सवाल करत लाडक्या बहिणीवर अन्याय का, असा सवाल करत यानिमित्ताने का होईना आपल्या लाडक्या बहिणीलाही महिना १० हजार रुपये देवून या महाराष्ट्रात स्त्री-पुरुष समानता असल्याचे दाखवून द्या,असे खुले आव्हानच त्यांनी सरकारला व पर्यायाने मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.
जो जिंकेल त्याची जागा…..
लोकसभा निवडणुकीत मिळालेला अनपेक्षित विजयाला नजरेसमोर ठेवून प्रचंड आत्मविश्वास आलेल्या महाविकास आघाडीत घटक पक्षांनी
येत्या ३ महिन्यांवर येणारी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवत राज्यातल्या सर्वच २८८ जागांची स्वतंत्र चाचपणी करत आपापल्या पक्षांतर्गत बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. याकडे जागावाटपा संदर्भात खा. यांना विचारणा केली असता ते ताडकन म्हणाले की तिघांचाही अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आम्ही एकत्र बसू आणि कुणी, कुठे आणि कशा जागा लढवायच्या हे ठरवू, लोकसभेप्रमाणे ज्याची ताकद जिथे जास्त, जो जिंकू शकेल, त्यालाच तो मतदारसंघ मिळेल हे आमचे सूत्र असल्याचे सांगत महाविकास आघाडी विधानसभेतही २८० जागा जिंकेल असा ठाम दावाही खा.राऊत यांनी केला.
……………………….