मुंबई – एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर कडवट टीका केली आहे. जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मोदी मुलाखतीमध्ये म्हणाले की, अधिकृत राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. राष्ट्रवादीमध्ये जे झाले त्याला शरद पवार राजकीय रंग देत आहेत, पण हा कौटुंबिक वाद आहे. घरातले हे भांडण आहे. काम करणा-या पुतण्याला वारसा द्यायचा की मुलीला द्यायचा हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यामुळे भांडण झाले. लोकांमध्ये सहानुभूती नसून लोकांमध्ये राग आहे असे म्हणत मोदींनी पवारांना लक्ष्य केले.
उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत. ते आजारी होते तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायचो. ऑपरेशनपूर्वी त्यांचा मला फोन आला होता. बाळासाहेबांचे पुत्र म्हणून मी त्यांचा मान-सन्मान तर करणारच. ते कधी संकटात अडकले तर मी त्यांच्या मदतीसाठी धावणारा पहिला व्यक्ती असेल. पण, एक कुटुंब म्हणून मी त्यांना मदत करेन. राजकीय व्यक्ती म्हणून नाही. उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. बाळासाहेब माझ्यावर अत्यंत प्रेम करायचे. त्यांच्या विचारासाठी जे जगले.
आमचेही विचार तेच आहेत. आमचे सर्वाधिक आमदार आहेत. तरी आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. मी बाळासाहेबांना वाहिलेली ही श्रद्धांजली आहे. मी बाळासाहेबांवर कधी टीका केली नाही. उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी मी त्यांच्यावर टीका करणार नाही. कारण, माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यांच्या प्रेमाचं कर्ज मी उतरवू शकत नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. २०१४ मध्ये म्हणाले होते निवडणूक शेवटची असेल, २०१९ मध्ये देखील तेच म्हणण्यात आले. आता २०२४ मध्ये देखील तेच म्हटलं जात आहे. देशात कधीही हुकूमशाही येणार नाही. देशात ९०० पेक्षा जास्त टीव्ही चॅनल आहेत. न्यायव्यवस्था शक्तिशाली आहे. अशा देशामध्ये कशा प्रकारे हुकूमशाही येऊ शकते? विरोधकांना करण्यासारखे काही राहिले नाही म्हणून ते टीका करतात, असे मोदी म्हणाले.