जालना – एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षण न मिळाल्याने मनोज जरांगे आक्रमक आहेत. दरम्यान जरांगेंना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एका युट्यूब चॅनेलच्या कमेंटमधून ही धमकी देण्यात आल्याने ऐन निवडणुकीत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना अज्ञाताकडून धमकी देण्यात आली आहे.
एका युट्यूब चॅनलच्या कॉमेंटमध्ये अज्ञाताकडून ही धमकी देण्यात आली असून कॉमेंटचा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार, अशा आशयाची ही धमकी असल्याचं कॉमेंटमध्ये लिहिण्यात आले आहे. बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाऊंटवरुन ही धमकी दिली जात आहे. त्यामळे, जरांगेंच्या भेटीसाठी येणाऱ्या उमेदवारांची किंवा बैठकी दरम्यान आतमध्ये जाणाऱ्या सर्वांची आता तपासणी केली जाणार असल्याचे समजते. दरम्यान, जरांगे सध्या बसत असलेल्या सरपंच मळा येथील बैठकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.