रत्नागिरी : दापोली मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार योगेश रामदास कदम यांच्या प्रचारासाठी शिंदे यांची आज दापोलीत सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेसच्या दावणीला बांधलेले धनुष्यबाण आणि शिवसेना आम्ही सोडवली. शिवसेनेशी आणि धनुष्यबाणाशी कोकणातली जनता प्रामाणिक आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहोत. म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या वेळीही कोकणाने बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनाच साथ दिली. कोकणात महायुतीचे भगवे फडकल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात १७० जागा महायुतीला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
आम्हाला लाडक्या बहिणींना लखपती झालेले पाहायचे आहे. लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेसाठीही दक्ष आहोत. म्हणूनच पोलिस दलात २५ हजार महिलांची भरती करण्याचा निर्णय घेतला. कोयनेचे दररोज वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी कोकणाचा अनुशेष भरून काढू शकते. त्यासाठी रामदास कदम यांनी प्रयत्न केले होते. ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. आता त्या योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोकणात पाणी अडवून, छोटी धरणे बांधून हा भाग सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होणार आहे. त्या प्रकल्पाला पैसे कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते म्हणाले, आपल्याला कोकणाला आंतरराष्ट्रीय नकाशावर न्यायचे आहे. दापोलीला पर्यटकांचे नंदनवन बनवल्याशिवाय योगेश कदम स्वस्थ बसणार नाहीत. आम्ही प्रसिद्ध केलेला वचननामा म्हणजे फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है.
गेल्या निवडणुकीत लोकांनी विश्वासाने शिवसेना-भाजप युतीला मतदान केले होते. त्यांच्याशी विश्वासघात करून अनैसर्गिक युतीचे सरकार सत्तेवर आले. ही बेइमानी आहे. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचे सगळे बालेकिल्ले, गड लोकांनी उद्ध्वस्त करून टाकले, असेही शिंदे म्हणाले. लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी संविधानबदलाबद्दल केलेल्या अपप्रचाराचाही शिंदे यांनी समाचार घेतला. ‘जब तक सूरज चांद रहेगा, बाबासाहेब का संविधान नही बदलेगा, कायम रहेगा,’ अशा शब्दांत त्यांनी संविधान बदलणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.