मुंबई –भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ मुंबईतील साकीनाका परिसरात सभा घेतली. या सभेतून देशभक्ती आणि दहशतवादावर भाष्य करताना काँग्रेससह इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. तसेच, काँग्रेससोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरेही गप्प बसले आहेत, तेही काही बोलत नाहीत, असे फडणवीसांनी म्हटले. भाषणाच्या सुरुवातीलाच, मी मोदीजी आणि नड्डा यांचे आभार मानतो, त्यांनी आतंकवाद्यांशी लढणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली. आठवा तो हल्ला आपल्या मुंबईवरचा, आठवा तो कसाब, जो आपल्या हेमंत करकरे, अशोक कामटे, साळसकर यांना शहीद करून टाकतो,अशी आठवण सांगत फडणवीसांनी उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवर भाष्य केलंय.
उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली तेव्हा काँग्रेसने फणा केला, आपल्या शहिदांवर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले. मात्र, आज कसाबला फाशी झाली ती उज्ज्वल निकम यांच्यामुळे झाली, असे फडणवीस यांनी म्हटले. आधी आपला देश कसा होता, इकडे आतंकवादी यायचे, हल्ले करुन जायचे आणि काँग्रेसचं सरकार फक्त निषेध करायचे. मात्र, मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला. त्यामुळेच, 2019 नंतर आपल्या देशात हल्ला करण्याची हिंमत पाकिस्तानच्या बापाची देखील झाली नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.
आपण दहशवाद्यांविरोधात लढा दिला. एक देशाच्या सीमेवर लढणारा आमचा सैनिक होता, दुसरा पोलीस होता, तर आमचा कोर्टात लढणारा एक सैनिक म्हणजे उज्ज्वल निकम होते, असे म्हणत दशवादाच्या मुद्दयावरुन देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. आमचे उद्धव ठाकरेदेखील तोंड बंद करून बसले आहेत. उद्धव ठाकरे काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं. तसेच, उद्धव ठाकरे बोलायला तयार नाही, त्यांना चिंता काही मुठभर मतांची आहे, म्हणून ते तोंड बंद करुन बसले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंवरही फडणवीसांनी हल्लाबोल केला.
ही गल्लीची निवडणूक नाही दिल्लीची आहे, आपल्याला देशाचा नेता निवडायचा आहे. देशात आज महाभारतासारखे दोन गट झाले आहेत. कौरवांची संख्या जास्त होती, पांडवांची संख्या कमी होती. आज वेगवेगळ्या पक्षांसोबत आपली युती आहे आणि कौरवांकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधी यांच्याकडे
उद्धव ठाकरे आहेत.