मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचार सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधींनी पुनर्जन्म घेतला तरी जम्मू काश्मीरमधील 370 कलम पुन्हा लागू करु शकत नाहीत अशी दर्पोक्ती करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत 370 कलमाचा काय संबंध? महागाई, बेरोजागारी प्रचंड वाढली आहे, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, त्याच्या सोयाबीन, कांदा, दूध, कापसाच्या भावावर मोदी शाह का बोलत नाहीत? असा सवाल खर्गे यांनी केला आहे. काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मल्लिकार्जून खर्गे यांच्या त्र्यंबकेश्वर व पुण्यात जाहीर सभा झाल्या. जम्मू-काश्मीरशी संबंधित 370 कलमाचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काहीच संबंध नाही. तेव्हा इथले स्थानिक मुद्दे वगळून कलम 370 ची चर्चा कशासाठी असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला. त्र्यंबकेश्वर आणि पुणे येथील मविआच्या सभेत त्या बोलत होते.
या सभेत खर्गेंनी भाजपा व मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले की, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारने देशात विकासाची गंगा आणली. आयआयएम, आयआयटी, मोठे कारखाने, धरणे, वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये, रुग्णालये, विविध संस्था उभा केल्या. हे विकासाचे काम काही मागील 11 वर्षात झालेले नाही. पंडित नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसह सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. राजीव गांधी यांनी मतदानाचे वय 21 वरुन 18 वर्षे केले.
डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारने गरिबांसाठी मनरेगा, अन्नसुरक्षा कायदा आणला. संविधानाने दिलेला अधिकार कायम ठेवायचे असतील तर लोकशाही व संविधानचे रक्षण करा, असे आवाहन खर्गे यांनी केले महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सोयाबीनला बोनससह 7 हजार रुपयांचा भाव देऊ, कांदा, कापसाला योग्य भाव देऊ, शेतकऱ्यांना 3 लाखांची कर्जमाफी देणार, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणार, महिलांना 3 हजार रुपये व मोफत बस प्रवास, 25 लाखांचा आरोग्य विमा व सरकारी नोकर भरती करु, असे आश्वासन मल्लिकार्जून खर्गे यांनी दिले.