पक्षपाती पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग का हटवत नाही ? – नाना पटोले

0

मुंबई – विधानसभेच्या निवडणुका सुरु झाल्या असतानाही निवडणूक आयोगाने अद्याप पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले नाही. काँग्रेस पक्षाने रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती पण त्याकडे आयोगाने दुर्लक्ष केले आहे. पश्चिम बंगाल व झारखंडच्या पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली असता त्यांना तात्काळ बदलण्यात आले पण महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना याच निवडणूक आयोगाने अद्याप हटवले नाही. रश्मी शुक्ला या वादग्रस्त व भारतीय जनता पक्षाला मदत करणाऱ्या अधिकारी आहेत, त्या पदावर असल्याने निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पडतील असे वाटत नाही त्यामुळे त्यांना पदावरून तात्काळ हटवावे, या मागणीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुनरुच्चार केला आहे.

निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, काँग्रेस पक्षाने २४ सप्टेंबर २०२४ व ४ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्र पाठवून रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. २७ सप्टेंबर रोजी निवडणुक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे व त्यांना नाहक त्रास देण्याचे फर्मान पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना सोडले आहे, पोलीस यंत्रणा विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची अडवणूक करत आहेत, त्यांच्यावर दबाव आणत आहेत, धमक्या देत आहेत. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती याआधीही वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते, शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर त्यांना पोलीस महासंचालक पदावर नियुक्त करण्यात आले आणि निवृत्तीनंतरही त्यांना नियमबाह्य पद्धतीने कार्यकाल वाढवून दिला आहे. निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवणे गरजेचे आहे, आयोगाने त्यांना तात्काळ हटवावे, असे नाना पटोले म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech