मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नाही

0

हातकणंगले – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यातील शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगलेमधून स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टींचा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होईल आणि मविआच्या पाठिंब्यावर ते निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होती. तसेच राजू शेट्टी यांच्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर सातत्याने भेटीगाठी होत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळे राजू शेट्टी ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर हातकणंगलेमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चादेखील रंगू लागली होती. ठाकरे गटाने राजू शेट्टींना तसा प्रस्तावदेखील दिला होता. परंतु, शेट्टी यांनी हा प्रस्ताव नाकारत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाचा प्रस्ताव नाकारण्याचं कारणही स्पष्ट केलं आहे.

राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या काही बैठकांमध्ये आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. स्वाभिमानीने गेल्या तीन वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची स्वतंत्र तयारी केली होती. परंतु, मधल्या काळात भाजपाविरोधातील मतांची विभागणी टाळण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा असा विचार आमच्या काही सदस्यांनी मांडला होता. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते सातत्याने सांगत होते की, ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार नाहीत. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणार, असं म्हणत होते. मविआने हातकंणगलेत उमेदवार देऊ नये, जेणेकरून भाजपाच्या विरोधातील मतांची विभागणी होणार नाही, अशी भूमिका घेऊन मी दोन वेळा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटलो होतो. आमच्यात यावर सविस्तर चर्चा झाली. त्यातले काही मुद्दे उद्धव ठाकरे यांना पटले. त्यावर त्यांनी लवकरच निर्णय घेऊ असं आम्हाला सागितलं होतं.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech