मुंबई – ‘एखाद्या दुकानात माल नसला आणि त्याला विचारलं कसं चालंत? तो म्हणणार उत्तम चालतो. अरे पण दुकानात मालच नाही. उत्तम चालायचं काय? शिवसेनेमध्ये काही राहिलेलं नाही. यात कोकणाचा काहीही संबंध नाही. 3 लाखांनी जिंकणार, 4 जूनला धमाका होणार आहे. त्याला ज्योतिषाची गरज नाही”, असा विश्वास भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आज पार पडलेल्या मतदानावर भाष्य केले.
नारायण राणे म्हणाले, मतदानाची टक्केवारी समजायला आणखी वेळ लागेल. कारण 1 ते 2 वाजेपर्यंत काही ठिकाणी 40, 45 आणि 50 अशा टक्केवारीने मतदान झाले होते. शेवटच्या टप्प्यापर्यंत 60 ते 70 टक्क्यांपर्यंत जाईल. कमी मतदान आमच्या फायद्याचे असू शकते. मी वैयक्तिक प्रश्नांना उत्तर देणार नाही. मीडियाला काहीतरी हवं असतं, चांगलं काही तुम्हाला चालत नाही. मी वादग्रस्त काही बोलणार नाही. मला किरण सामंत यांचे चांगले सहकार्य मिळाले आहे, असेही नारायण राणे यांनी सांगितले.
पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, लोकसभेची निवडणूक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागाची 7 मे रोजी पार पडली आहे. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा उमेदवार या नात्याने सांगने की, कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली. महायुतीतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनीधी या सर्वांनी चांगलं काम केलं. त्यामुळे वातावरण विजयाचे बनले आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. त्याच प्रमाणे माझ्या पक्षाचे प्रमुख अध्यक्ष नड्डाजी, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि अमितजी शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो, असंही राणे म्हणाले.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.75 टक्के मतदान पार पडले आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून विनायक राऊत निडवणुकीच्या रिंगणात होते. तर भाजपने केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.