(अनंत नलावडे)
मुंबई- उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरूवारी महायुतीच्या नेत्यांविरोधात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जी आव्हानाची भाषा वापरली ती फक्तं लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी असून त्यासाठी मनगटात जोर असावा लागतो. आणि घरात बसून कोणी आव्हान देत नाही त्यासाठी मैदानात उतरावे लागते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी एका कार्यक्रमात बोलताना उध्दव ठाकरे यांना सणसणीत टोला लगावला.
बुधवारी उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोलताना’ आता एकतर तू नाही, अन्यथा मी नाही ‘ अशी आव्हानात्मक भाषा वापरत अतिशय शिवराळ भाषेत यथेच्छ तोंडसुख घेतले होते. मात्र त्याचे तीव्र पडसाद येथील राजकीय वर्तुळात न उमटले तरच आश्चर्य.
गुरूवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भाषणाला आलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या कालच्या भाषणाचा सडकून समाचार घेतला.
शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कामाची आणि महायुतीच्या दोन वर्षांच्या कामाची तुलना करा.जनतेला सर्व काही माहित आहे.एमव्हीएचा विकासविरोधी अजेंडा होता. कारण कोरोनाचे भय दाखवून महाविकास आघाडीने अनेक विकासात्मक कामे बंद पाडली. मात्र आमच्या सरकारने सर्व कामांना प्राधान्य देत त्याच कामांना गती दिली.काम केले. आता ती कामे सर्वत्र दिसत आहेत.पंतप्रधान येऊन उद्घाटन करत आहेत.अन्नपूर्णा योजना, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, मुलींना मोफत उच्च शिक्षणाच्या योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना अशा कल्याणकारी योजना पाहून विरोधक घाबरले असून विरोधकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्याला पोटात दुखत आहे.
ठाकरे यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, ते लोकांचे लक्ष वळवण्यासाठी अशी भाषा बोलत आहेत. घरात बसून कोणी आव्हान देत नाही. त्यासाठी मैदानात उतरावे लागेल. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतात काम करणारी माणसं आहोत. एखाद्याला संपवायचे असेल तर त्याच्या हातात ताकद असली पाहिजे. आम्ही आरोपांना कारवाईने उत्तर देतो. ते आमच्या कामाला घाबरतात, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी मार्मिक शब्दात उध्दव ठाकरेंची साफ पिसेच काढली.
‘ पहलेही कई तूफानों का रूख मोड़ चुका…….
तरं येथे मुंबई भाजपकडून ठाकरे यांच्यावर पलटवार करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ पक्षाने सोशल मीडियावर टाकला आहे. या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री कवितेत उत्तर देताना म्हणत आहेत की, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, पहले ही कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं मैं।
……………………………….